मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी 'सखी सावित्री' समिती गठीत करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळास्तरावर "सखी सावित्री" समिती
पार्श्वभूमी
बालकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे याकरिता संयुक्त राष्ट्रसंघाने सन १९८९ मध्ये बालहक्कांसंदर्भात बालहक्क संहिता स्वीकारली असून त्याद्वारे सर्व बालकांना मूलभूत मानवी हक्क मिळविण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. जसे की,
- जीविताचा अधिकार
- शारीरिक आणि बौद्धिक सुप्त गुणांचा विकास करण्याचा अधिकार
- बालकांच्या विकासावर घातक परिणाम होईल अशा प्रभावापासून संरक्षणाचा अधिकार तसेच
- कौटुंबिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात सहभागी होण्याचा अधिकार इ.
बालकांचे हक्क हे विशेष मानवी हक्क आहेत, जे १८ वर्षांखालील सर्व मुला-मुलींना लागू आहेत.
जात, धर्म, वंश, लिंग, रंग, भाषा आणि संपत्ती इत्यादींचा विचार न करता सर्व बालकांना हक्क मिळवून देणे हे बालहक्क संहितेनुसार क्रमप्राप्त आहे.
महाराष्ट्रात बालकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रचलन आणि रक्षण करण्यासाठी बालहक्क संरक्षण कायदा २००५ अन्वये जुलै २००७ मध्ये महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
तथापि बालहक्क आयोगाच्या स्थापनेपूर्वीपासून महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक थोर समाजसुधारकांच्या पुरोगामी विचारांचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे.
📌 माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना संपूर्ण माहिती
>> जीवन चरित्र- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
>> निबंध - महात्मा गांधी मराठी निबंध
थोर समाज सुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या अग्रणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात बालहक्काचे महत्त्व ओळखून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. तसेच बालविवाह, सती, केशवपन अशा अनेक अनिष्ठ रूढी परंपरांविरुद्ध त्यांनी बंड पुकारले.
बालहक्क संरक्षण कायदयानुसार सर्वच बालकांच्या हिताचे/ हक्कांचे रक्षण करणे अभिप्रेत आहे. यासाठी शाळेतील मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी "सखी सावित्री" समितीची निर्मिती करण्यात येणार आहे.
"सखी सावित्री" समिती मुख्य उद्देश
मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी "सखी सावित्री" कमिटी तालुका, केंद्र आणि शाळास्तरावर काम करणार आहे. "सखी सावित्री" समितीचा मुख्य उद्देश म्हणजे घर, शाळा आणि समाजात मुला-मुलींना सुरक्षित व बालस्नेही वातावरण मिळावे, तसेच त्यांचे सामाजिक, भावनिक, अध्ययन उत्तमरित्या व्हावे हा "सखी सावित्री" समितीचा मुख्य उद्देश आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विविध स्तरावर शाळा स्तर, केंद्र व तालुका स्तरावर "सखी सावित्री" समिती गठीत करून मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी सखी सावित्री समिती काम पाहणार आहे.
गरज का निर्माण झाली?
सदयस्थितीत मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज जाणवत आहे.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर मुला-मुलींच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झालेले दिसत आहेत. पालकांच्या स्थलांतरामुळे शाळाबाहय मुला-मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. तसेच बालविवाहांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.
शाळास्तर "सखी सावित्री" समितीची कार्ये
- शाळास्तरावर १००% मुला-मुलींची (दिव्यांग विद्यार्थी) पटनोंदणी व १००% उपस्थिती टिकवून ठेवणे.
- स्थलांतरीत पालकांच्या व शाळाबाहेर असलेल्या सर्व मुला-मुलींना सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करणे.
- विद्यार्थ्यांच्या भावनिक, शारीरिक व बौध्दिक विकासासाठी तसेच ताणतणाव मुक्तीसाठी मुला-मुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे.
- मुला-मुलींच्या शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देऊन प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही करणे.
- मुला-मुलींना करिअर संबंधी मार्गदर्शन करणे, कौशल्य विकसनासाठी विविध उपक्रम राबविणे.
- मुलींच्या स्व-संरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
- मुला मुलींसोबत आरोग्यदायी सवयीसाठी संवाद साधणे आणि निरोगी जीवनासाठी स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर, समुपदेशन यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करणे.
- आपल्या कार्यक्षेत्रातील बालविवाह रोखून, बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम व बालविवाहाविषयी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये जनजागृती निर्माण करणे व मुलींचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रयत्न करणे.
- व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) च्या माध्यमातून सामाजिक, भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे.
- विविध कारणांमुळे मुला मुलींचा होणारा अध्ययन न्हास कमी करण्यासाठी उपाययोजना करणे.
- शाळेत समतामुलक वातावरण राहील यासाठी लिंगभेदविरहित व समावेशक उपक्रम राबवणे, विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत अशी निकोप वातावरण निर्मिती करणे.
- अपवादात्मक परिस्थितीत असे घडल्यास तक्रार दाखल करण्याबाबत लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत असलेल्या "ई-बॉक्स" या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेबाबतची माहिती तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या "CHIRAGT या अॅपची माहिती व चाइल्ड हेल्पलाइन नंबर (१०९८) बाबत सूचना फलक शाळेत लावले जातील याची खात्री करणे.
शाळास्तर "सखी सावित्री" समिती
केंद्र स्तर, तालुका स्तर सखी सावित्री समितीचे कार्य आणि रचना जाणून घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचा सखी सावित्री समिती संदर्भातील शासन निर्णय डाउनलोड करा.
सखी सावित्री GR PDF येथे डाउनलोड करा.