वाचन प्रेरणा दिन विशेष माहिती व उपक्रम

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 

संपूर्ण राज्यभर दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तसेच शासकीय कार्यालयामध्ये 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो.

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि ठाम आत्मविश्वास असणारे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोंबर 1931 रोजी रामेश्वर (तामिळनाडू) येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अब्दुल पाकिर जैनुलब्दीन अब्दुल कलाम असे आहे. 

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची संपूर्ण माहिती येथे वाचा 

देशाच्या युवा वर्गातील पिढीला त्यांनी आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते. भारत महासत्ता बनेल, हा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला होता. भारताची ताकत ही आजची युवा पिढी आहे हे त्यांनी ओळखले होते.

वाचन प्रेरणा दिन

डॉ. कलाम यांचे लेखन स्फूर्तीदायी आहे. डॉ. कलाम नेहमी म्हणत असत की, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांची पुस्तके वाचावीत, त्याचबरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या दृष्टीने वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करण्यात येत आहे. 

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे बालपण व शिक्षण संपूर्ण माहिती येथे वाचा 

वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न व माहितीसमृद्ध समाजाची जडण-घडण, व्यक्तिमत्त्व विकास, साहित्य विकास आणि भाषाविकास यांसाठी वाचन संस्कृतीचा विस्तार आणि विकास करणे अत्यावश्यक आहे.

वाचन प्रेरणा दिनाचा उद्देश

विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांमध्ये वाचनाची आवड, ओढ व प्रेरणा निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना आयुष्यात वाचनाचे महत्त्व पटावे, त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने वाचन प्रेरणा दिन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

वाचन प्रेरणा दिनाच्या दिवशी विशेषतः डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तकांचे वाचन शाळा, महाविद्यालयांमध्ये करण्यात यावे.

अवांतर वाचनाची आवड निर्माण करणे.

कोरोना च्या दरम्यान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींना स्क्रीन ची सवय लागलेली दिसत आहे. त्यातच वाचन प्रत्येकाचे कमी झालेले आढळून येते. वाचन हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात वाचनाचे खूप सारे फायदे आहेत. संस्कृतीचा विकास करणे आवश्यक आहे. 

वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वाचनाचे महत्व सर्व स्तरातील घटकांना पटवून देण्यासाठी १५ ऑक्टोबर या दिवशी अवांतर वाचन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण होण्याचे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न आहे.

आजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन होणे अत्यावश्यक आहे. अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात. त्यांची आकलन शक्ती वाढते तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो. म्हणूनच वाचन प्रेरणा दिवसामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होण्यास तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यास मदत होणार आहे. 

वाचन प्रेरणा दिन उपक्रम

वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वर्षभर वाचन करण्यासाठी वाचनाची सवय रुजवण्यासाठी खालील उपक्रम राबविता येतील.

वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने शाळेत खालीलप्रमाणे विविध उपक्रम आयोजित करण्यात यावेत.

  • डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करणे.
  • लोक सहभागातून वाचन कट्ट्यासाठी पुस्तके गोळा करुन शाळेत पुस्तकपेढी तयार करणे. 
  • डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करणे. 
  • एक व्यक्ती एक पुस्तक भेट हा उपक्रम राबविणे. 
  • प्रत्येक व्यक्तीने, शिक्षकांनी, माजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी एका विद्यार्थ्याला किंवा शाळेला विद्यार्थ्यांच्या वयाला अनुरुप होतील अशी पुस्तके भेट देणे. 
  • विद्यार्थ्यांना आनंदाने वाचन करता यावे म्हणून ‘वाचू आनंदे’ या तासिकेचे आयोजन करणे. 
  • चांगल्या पुस्तकांविषयी चर्चासत्रांचे आयोजन करणे. 
  • डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांवर आधारित व्याख्यानाचे आयोजन करणे.
  • परिसरातील लेखक, कवींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करणे. 
  • पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करणे. 
  • महान व्यक्तींच्या आयुष्यात वाचनामुळे घडलेले संस्कार याविषयीची माहिती देणे. 
  • पुस्तकांचे वाटप करुन ‘वाचक प्रेरणा दिन’ साजरा करणे. 
  • विद्यार्थ्यांचे गट करुन विविध पुस्तकांवर चर्चासत्रे घडवून आणणे. 
  • शाळांनी पुढाकार घेवून ‘पुस्तके तुमच्या भेटीला’ अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे.
  • शाळांमध्ये दर आठवड्यातील एक तास अवांतर वाचनासाठी राखीव ठेवणे.
  • शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये वाचन कट्टा तयार करणे. 
  • शाळांनी इनोवेटिव्ह फंडामधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील अशी पुस्तके खरेदी करून वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत. 
  • शाळा महाविद्यालयांमध्ये वाचनाचे महत्व पटवून देण्यासाठी साहित्यिकांमार्फत मार्गदर्शन सत्र आयोजित करावे.

वाचन दिन अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी सोशल मिडीयाचा वापरही करण्यात यावा. तसेच साहित्यिक, मान्यवर व्यक्तींनी वाचनाचे महत्व सांगणारे ट्विट करावे, असे आवाहनही शालेय शिक्षण मंत्री यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तसेच हा दिवस आपण सर्वांनी मिळून ‘नो गॅझेट डे’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

चला तर मग वाचक होऊया आणि काव्यवाचन, अभिवाचन, नो गॅझेट डे, वाचन कट्टा, समूह वाचन इत्यादी उपक्रमातून 'वाचक प्रेरणा दिन' अधिकाधिक उत्सफूर्तपणे साजरा होण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी होऊया..


हे सुद्धा वाचा

>> डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची संपूर्ण माहिती येथे वाचा 

>>  नवीन 'राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020

>> निपुण भारत मिशन कार्यक्रम २०२२ | Nipun Bharat Mission In Marathi

>> ‘शालेय आरोग्य कार्यक्रम’ | School Health Programme

Post a Comment (0)
Previous Post Next Post