आदर्श - शालेय परिपाठ सूत्रसंचालन मराठी

विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात ही शाळेपासून होत असते. प्राथमिक शिक्षण पूर्ण करत असताना योग्य वयामध्ये योग्य संस्कार त्यांच्यमध्ये रुजवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राथमिक स्तरावर शाळेची दैनंदिन दिवसाची सुरुवात ही शालेय परिपाठाने होत असते. शालेय परिपाठ हा दर्जेदार आणि योग्य पद्धतीने घेतला तर चांगल्या सवयी मुलामध्ये रुजतील, परिपाठामध्ये मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देता येईल त्यामध्ये शालेय परिपाठ सूत्रसंचालन पासून ते शालेय परीपाठातील सर्व कृती मुले स्वत:च पूर्ण करून घेतील यासाठी मुलांना संपूर्ण आदर्श शालेय परिपाठ (Paripath) आणि  सूत्रसंचालन कसे करता येईल याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. 

आदर्श - शालेय परिपाठ सूत्रसंचालन मराठी

उद्याचा चांगला नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना लहानपणापासून चांगल्या सवयी रुजवणे आवश्यक आहे. असे म्हटले जाते की, आजची शिक्षण पद्धती ही उद्याच्या आपल्या देशाची प्रगती त्यावर अवलंबून असते. यासाठी लहान वयातच विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण त्यांना योग्य पद्धतीने देणे आवश्यक असते. यासाठी लहान वयात प्राथमिक स्तरावर आदर्श शालेय परिपाठ नियोजन करताना इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांचे वर्गनिहाय मुले व मुली यांचे समान गट करावे आणि त्यांना परिपाठ घेण्यास दर दिवशी वेगळा गट याप्रमाणे नियोजन करून मुलांना तयार करावे. व शालेय परिपाठ घ्यावा. 

Paripath Marathi

आदर्श शालेय परिपाठ सूत्रसंचालन

  1. राष्ट्रगीत
  2. प्रतिज्ञा
  3. संविधान उद्देशिका
  4. प्रार्थना
  5. आजचे पंचांग 
  6. दिन विशेष
  7. आजचा सुविचार
  8. आजची म्हण
  9. बातम्या
  10. सामान्य ज्ञान (प्रश्न मंजुषा)
  11. विज्ञान कोडे (वैज्ञानिक दृष्टिकोण)
  12. बोधकथा
  13. आजचे इंग्रजी शब्दार्थ
  14. दिनांक तो पाढा
  15. समूह गीत
  16. पसायदान
  17. आना-पान
  18. मौन
  19. विसर्जन

राष्ट्रगीत

सावधान- विश्राम संचालन करणा-या विद्यार्थ्याने सर्व विद्यार्थ्यांना वर्गनिहाय व उंचीप्रमाणे रांगेत उभे राहून हाताचे अंतर घेण्यास सांगावे व विद्यार्थ्यांना सावधान- विश्राम संचालन सूचना कराव्यात. सावधान एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर.
राष्ट्रगीत हे सावधान स्थितीमध्ये ५२ सेकंदात राष्ट्रगीत कसे म्हणता येईल असा प्रयत्न करावा.

राष्ट्रगीत संचालन

सर्व लोकांच्या अंतःकरणाचा स्वामी
आणि भारताचा भाग्यविधाता,
अशा राष्ट्रगीताची गाऊ गाथा
गाऊनी राष्ट्रगीता, गाऊनी राष्ट्रगीता
सावधान एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर.

राज्यगीत - जय जय महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र राज्याने नुकतेच जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत स्वीकृत केले आहे. राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, राष्ट्रगीत / परिपाठ / प्रार्थना / प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले / गायले जाईल. याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित आहे. 

प्रतिज्ञा

प्राथमिक स्तरावर शालेय परिपाठामध्ये प्रतिज्ञा मध्ये आपण मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेत आलटून-पालटून प्रतिज्ञा म्हणायला हवी. करावयाच्या नियोजनामध्ये आठवड्यात साधारणपणे सोमवार ते शनिवार या कालावधीत एकूण 6 दिवस शाळा भरते. त्यासाठी आपण सोमवारी - मराठी प्रतिज्ञा , मंगळवारी- हिंदी व बुधवारी - इंग्रजी या क्रमाने रोटेशन पध्दतीने प्रतिज्ञा म्हणून घ्यायला हवे. ( इतर माध्यमाच्या शाळांनी देखील याप्रमाणे नियोजन करावे. उदा. उर्दू प्रतिज्ञा) प्रतिज्ञेचे नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या स्तर लक्षात घेऊनच याप्रमाणे नियोजन करावे.

प्रतिज्ञा संचालन

देशा विषयी प्रेम
मोठ्यां विषयी आदर
करून घेऊ बंधुभाव
व कर्तव्याची जान
उजळू सर्वांची प्रज्ञा
घेऊन प्रतिज्ञा,घेऊन प्रतिज्ञा
एकसाथ प्रतिज्ञा शुरू करेंगे शुरू कर

संविधान उद्देशिका

दिनांक 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच आपल्या भारतीय संविधानाबद्दल माहिती व्हावी, संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि ओळख होण्यासाठी आपल्या शालेय मराठी परिपाठामध्ये संविधान उद्देशिकाचे आपण वाचन करून घ्यावे. यासाठी इतर माध्यमातील शाळांनी त्या-त्या भाषेतील उद्देशपत्रिका वाचून घ्याव्यात.

संविधान उद्देशिका संचालन

लोकशाही गणराज्याचे गाऊ गान
घेऊनी भारताचे संविधान
घेऊनी भारताचे संविधान
एकसाथ संविधान शुरू करेंगे शुरू कर..
त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना रांगेत आहे त्याच ठिकाणी एकसाथ निचे बैठेंगे निचे बैठ ऑर्डर द्यावी.

प्रार्थना

आठवड्यातील नियोजनानुसार सहा वारांनुसार विद्यार्थ्यांना दररोज वेगवेगळी प्रार्थना म्हणण्यास सांगावे.
आपल्या शाळेतील मुलांच्या गटानुसार जो गट किंवा विद्यार्थी परिपाठ घेणार असेल किंवा प्रार्थना घेणार असेल त्यांच्या मागे किंवा एकसाथ प्रार्थना म्हणण्यास सांगावे.

प्रार्थना संचालन

प्रार्थना गीत
साने गुरुजींनी दिले सर्वांना ज्ञान
त्यांचे रचित गाऊया गान
त्यांचे रचित गाऊया गान
एकसाथ खरा तो एकची धर्म
शुरू करेंगे शुरू कर

आजचे पंचांग

आपल्याला वार , दिनांक , शके यांची माहिती असणे अवश्यक असते तसेच केव्हा दिवस उगवतो, केव्हा दिवस मावळतो , कोणता वार आणि कोणती तारीख आहे. हे आपल्याला पंचांगाच्या माध्यमातून समजते. म्हणून आजचे पंचांग घेऊन येत आहे. संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.

दिनविशेष

प्रत्येक नवीन दिवशी उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व असत आणि म्हणून घडून गेलेल्या घटनांना उजाळा देण्यासाठी आजचे दिनविशेष सांगण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.

दिनविशेष संचालन

कधी सोनेरी तर कधी काळा
दिवस असतो आजच्या दिवसाचे दिनविशेष
घेऊन येत आहे. संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.

आजचा सुविचार

सुविचार म्हणजे सुंदर असा विचार, एक चांगला विचार आपल्याला स्फूर्ती, प्रेरणा आणि उर्जा निर्माण करण्याची शक्ती सुविचार मध्ये असते. दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी व्हायला हवी,  म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे. संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.

सुविचार संचालन

सांगून सर्वांना थोरांचे विचार
रुजवू विचारातून संस्कार
सांगून सुविचार,सांगून सुविचार
सुविचार सांगण्यासाठी येत आहे...

आजची म्हण

म्हणीमध्ये कमी शब्दात जास्त अर्थ दडलेला असतो. म्हणून आजची म्हण घेऊन येत आहे. संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे व आजची म्हण सांगण्यास सांगावे. व विद्यार्थ्यांना म्हणीचा अर्थ सांगण्यास सांगावे.

बातमीपत्र

जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज काही ना काही घडत असते. तेच आपल्याला प्रसारमाध्यमांद्वारे (वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन) समजत असते. म्हणून आजचे बातमीपत्र घेऊन येत आहे. संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.

बातमीपत्र संचालन

काय घडले जगात,
काय घडले देशात,
जाणून घेऊया
आजच्या बातमी पत्रात,
बातमी पत्र सांगण्यासाठी येत आहे. (संबंधित वियार्थ्याचे नाव घेणे)
आपल्याला देशातील घडामोडिंची माहिती घेणे आवश्यक असते म्हणुन आजची विशेष बातमी सांगत आहे. विद्यार्थ्याचे नाव घेणे. प्रत्यक्ष वर्तमानपत्र वरील बातमी वाचन करून दाखवावी व त्याचे स्पष्टीकरण किंवा त्याची थोडक्यात मुलांना माहिती सांगावी.

सामान्य ज्ञान (प्रश्न मंजुषा)

विद्यार्थ्यांना लहान पणापासून स्पर्धा परीक्षा तसेच स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सामान्य ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार सामान्य ज्ञान प्रश्नांची निवड करून प्रश्नमंजुषा घ्यावी. यामध्ये किमान ५ सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारावे.

सामान्य ज्ञान संचालन

सागरा समान विस्तृत ज्ञाना
थेंब थेंब मी वेचून घेतो
सामान्य ज्ञानातून मिञा
मोती होवून चमकून जातो
सामान्य ज्ञान सांगण्यासाठी
येत आहे. विद्यार्थ्याचे नाव घ्यावे.

उन्हात चालण्यासाठी सावलीची गरज असते ,
अंधारात चालण्यासाठी उजेड हवा असतो. 
तसेच ज्ञानरूपी जीवन जगण्यासाठी ज्ञानाची गरज असते , 
म्हणून सामान्य ज्ञान घेत आहे . विद्यार्थ्याचे नाव घ्यावे.

बोधकथा

विद्यार्थ्यांना जेवढ्या नवनवीन बोधकथा ऐकायला मिळतील तेवढा त्यांचा शब्दसाठा वाढेल त्याचबरोबर भाषा विकास चांगला होईल त्याचबरोबर विद्यार्थी गोष्टीतून चांगला बोध घेऊ शकतील.
आपल्याला ज्यातून बोध होतो अशी एक बोधपर कथा सांगत आहे.
कथा म्हणजे गोष्ट किंवा कहाणी . परंतु बोधकथा म्हणजे ज्या गोष्टीतून चांगले शिकायला मिळते. चांगले अनुभवायला मिळते व योग्य तात्पर्य मिळते. म्हणून आजची बोधकथा घेऊन येत आहे. विद्यार्थ्याचे नाव घ्यावे.

बोधकथा संचालन

संस्काराशी नाते जडे
बोधकथेतून घेऊ धडे
बोधकथा सांगण्यासाठी येत आहे. (विद्यार्थ्याचे नाव घ्यावे.)

विज्ञान कोडे (वैज्ञानिक दृष्टिकोन)

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी विज्ञान कोडे परिपाठात घ्यावेत. यामध्ये दररोज एक विज्ञान कोडे मुलांना सांगावे. व त्याचे उत्तर उद्याच्या परिपाठात सांगण्यास सांगावे. व त्याचे स्पष्टीकरण शिक्षकांनी द्यावे. (कालच्या कोड्याचे उत्तर व स्पष्टीकरण आजच्या परीपाठामध्ये द्यावे.)
विज्ञान कोडे सांगण्यासाठी येत आहे. (विद्यार्थ्याचे नाव घ्यावे.)

आजचे इंग्रजी शब्दार्थ

विद्यार्थ्यामधील इंग्रजीची भीती घालवण्यासाठी त्यांच्या शब्दसाठा वाढवण्यासाठी आजचे इंग्रजी शब्दार्थ यामध्ये दररोज किमान ५ इंग्रजी शब्दार्थ विद्यार्थांना शोधून आणायला सांगावे. व ते परिपाठात सांगावे.
आजचे इंग्रजी शब्दार्थ घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.

दिनांक तो पाढे

गणितासाठी  दिनांक तो पाढे हा देखील एक उपक्रम आपण परिपाठात घेऊ शकता.
गणिता सारखा अवघड विषय पाढ्यावर आधारलेला विषय आहे. गणितामध्ये पदोपदी पाढ्यांची गरज भासते. तेव्हा पाढे पाठांतर असणे गरजेचे आहे. म्हणून आजचा पाढा घेऊन येत आहे. संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.

समुहगीत

सर्व विद्यार्थ्यांनी मिळून समुह्गीत गायन करावे.

पसायदान 

बैठे सावधान अवस्थेमध्ये पाठीचा कणा ताठ, हात गुडघ्यांवर सरळ ठेऊन दोन्ही डोळे मिटवून व सरळ बसुन समूहाने पसायदान घ्यावे.
समाज उद्धरण्या मागीतले दान
ज्ञानेश्वरांचे पसायदान
एकसाथ पसायदान शुरू करेंगे शुरू कर

आनापान ध्यान

आनापान हे एक वैज्ञानिक तंत्र असून, जिथे 'अना' म्हणजे आत येणारा श्वास आणि 'आपान' म्हणजे बाहेर जाणारा श्वास या श्वासावर साक्षीभावाने बघणे अपेक्षित असते. त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी मदत मिळते.
दररोज किमान 5 ते 10 मिनिटे विद्यार्थ्यांचे अनापान ध्यान करून घ्यावे. त्यावेळी मुलांना सूचना देण्यात याव्यात सुरुवातीला श्वास आत घेणे यावर लक्ष द्या. नंतर श्वास बाहेर सोडा यावर लक्ष द्या. यासाठी सूचना द्याव्यात. 
हळूहळू श्वास-आत घेणे व बाहेर सोडणे ही क्रिया नैसर्गिकरित्या होणे अपेक्षित आहे व त्याकडे फक्त लक्ष देणे आवश्यक आहे.

मौन

मौन – २ मिनिटे शांत अवस्थेत डोळे मिटून मौन धरावे.

विसर्जन

विसर्जन - विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गात रांगेत जावे.
अशा पध्दतीने आपण शालेय परिपाठ घेण्याबाबत नियोजन करू शकाल, आपल्या शालेय परिस्थिती व विद्यार्थ्यांच्या स्तराचा विचार करून हवा तसा बदल करता येऊ शकेल व नविन गोष्टी किंवा उपक्रम ऍड करता येतील.

सारांश

आजच्या लेखामध्ये आपण आदर्श शालेय परिपाठ मराठी कसा असावा याबद्दल चर्चा केली. त्यामध्ये राष्ट्रगीत पासून ते विसर्जन पर्यंतच्या संपूर्ण Shaley Paripath Marathi कृती यावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये विशेष विज्ञान कोडे, गणित व इंग्रजी विषयावर लक्ष देण्याबाबत उपक्रम चर्चा करण्यात आली. तेव्हा आपणा सर्वांना शालेय परिपाठ घेण्यासाठी शुभेच्छा !


शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post