Educational News : सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच ‘ज्युनिअर आणि सीनियर केजी’चे वर्ग – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

Educational News

Educational News : शिशुवर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी लवकरच राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशुवर्गाचे (सिनियर केजी, ज्युनियर केजी) शिक्षण दिले जाणार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर (पश्चिम) येथील सखाराम तरे मुंबई पब्लिक स्कूल इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला स्थानिक आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रकाश सुर्वे, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आदी मान्यवरांसह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले, “आज शाळेचा पहिलाच दिवस आणि आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह शाळेच्या नवीन वास्तूत शिक्षण घेता येणार आहे. या गोष्टीचा मनस्वी आनंद होत आहे. यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यात आले आहे. त्यांना वह्या मोफत दिल्या असल्या तरीही त्या शाळेत न आणता त्यांचा घरीच अभ्यास करायचा आहे. 

दररोज शाळेत येताना सर्व विषय एकत्र असलेले एकच पुस्तक आणायचे आहे. याच पुस्तकात धडा संपल्यानंतर वह्यांची कोरी पाने जोडण्यात आली आहेत. त्यामुळे धडा समजून घेतल्यानंतर त्या विषयाचे महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थी लिहू शकतील. अशा प्रकारची चार पुस्तके वर्षभरासाठी देण्यात आली आहेत”, असे त्यांनी नमूद केले. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लवकरच रोबोटिक, विज्ञान आणि भाषा विषयासंदर्भातील प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. 

मुंबई महानगरात ज्या-ज्या ठिकाणी शाळांची गरज असेल त्यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रस्ताव तयार करावा, त्याला मंजुरी देण्यात येईल, असेही श्री. केसरकर यांनी सांगितले. दहिसर परिसरात सातवीपर्यंत असलेल्या शाळा लवकरच आठवी ते दहावीपर्यंत सुरू करण्यात येतील, असे श्री. केसरकर यांनी सांगताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

व्यावसायिक शिक्षणासह परकीय भाषादेखील अवगत करावी

मंत्री श्री. केसरकर पुढे म्हणाले, “जगातील अनेक देशांमध्ये मातृभाषेतच शिक्षण दिले जाते. ठराविक देश वगळता इतर ठिकाणी इंग्रजी भाषेचा वापर केला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मराठी आवर्जून शिकावी. त्यासोबतच इंग्रजीसह फ्रेंच, जर्मन, रशियन अशा परकीय भाषांचेही आवश्यक ज्ञान घ्यावे. त्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना जगभरात रोजगाराची संधी उपलब्ध होईल. तसेच अभ्यास करत असतानाच गणित, विज्ञान आणि व्यावसायिक शिक्षणावरही भर द्यावा”, असे आवाहन पालकमंत्री श्री. केसरकर यांनी विद्यार्थी व पालकांना केले.

उपशिक्षणाधिकारी श्रीमती संगीता तेरे यांनी प्रास्ताविक केले. आमदार मनीषा चौधरी यांनी दहिसर परिसरातील विकासकामांची माहिती देताना दहिसर नदी स्वच्छता व संवर्धनाची माहिती दिली.

चार हजार विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

आर/उत्तर विभागातील सखाराम तरे मार्ग महानगरपालिका शाळेची स्थापना सन १९५७ मध्ये झाली. या इमारतीमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती माध्यमाच्या शाळा असून सुमारे ४ हजार विद्यार्थी या संकुलात शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी संख्या सतत वाढत असल्याने, तसेच वर्गखोल्या अपुऱ्या पडत असल्याने प्रशासनाने या इमारतीच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेतला. आधीच्या इमारतीची रचना तळ मजला अधिक २ मजले अशी होती. पुनर्बांधणीनंतर इमारतीची रचना तळमजला अधिक ६ मजले प्रस्तावित करण्यात आली. दिनांक १४ मार्च २०२० रोजी या इमारतीची पुनर्बांधणी सुरू झाली होती.

दुसऱ्या टप्प्याचेही काम लवकरच

दोन टप्प्यामध्ये या इमारतीची पुनर्बांधणी प्रस्तावित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यामध्ये तळमजला अधिक सहा मजले इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतीमध्ये विज्ञान प्रयोगशाळा वाचनालय, सभागृह, विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवीन इमारतीत जुन्या इमारतीतील विद्यार्थ्यांना स्थलांतरित करण्यात येणार असून, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येईल.

शाळेच्या पहिल्याच दिवशी भारावले विद्यार्थी

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाद्वारे मागील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये 'मिशन अॅडमिशन' या उपक्रमांतर्गत १ लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्यात आले. तसेच यंदाच्या २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याकरिता व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी 'मिशन मेरीट' उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दहिसर येथील मुंबई स्कूलच्या नवीन इमारतीत शाळेच्या पहिल्याच दिवशी बसायला मिळणार असल्याने विद्यार्थी भारावले होते. शालेय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मंत्री श्री.  केसरकर यांनी शाळेच्या नवीन इमारतीची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती
Post a Comment (0)
Previous Post Next Post