Child Rights News : राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात येईल. बालहक्क संरक्षण अधिनियमाची (Child Rights Protection Act) प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
राज्यात ‘बाल हक्क संरक्षण अधिनियमा’ची प्रभावी अंमलबजावणी करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, प्रत्येक बालकाचा सर्वांगीण विकास करून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण क्षमतेने विकास करण्यासाठी महिला व बालविकास विभाग विविध योजना राबवित आहे. या योजनांना गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
कुपोषण मुक्तीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, बालकांचे संगोपन, सुरक्षित व योग्यरित्या होण्यासाठी काळजी घेण्यात येईल. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून बालकांच्या विकासासाठी व जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची जास्तीत जास्त माहिती पोहोचवावी.
कौटुंबिक वातावरणापासून वंचित असलेल्या बालकांना विशेष संरक्षण आणि मदत मिळण्याचा हक्क देण्यासाठीही महिला व बालविकास अनेक योजना राबवित आहे. या योजनांना अधिक गती देण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती आयोगाच्या अध्यक्ष अॅड. शहा यांनी दिली. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष अॅड. सुशिबेन शहा यांनी विधानभवन येथे दिलेल्या भेटीवेळी मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी एकात्मिक बाल विकास विभागाच्या आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होत्या.