अंध व्यक्तींच्या ध्वज निधी संकलन मोहिमेचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ, दिव्यांग व्यक्तींना समाजाकडून सहानुभूती नको, तर त्यांना सहकार्य करा

Blind Peoples Flag Fundraising Campaign : दिव्यांग व्यक्तींची ज्ञानेंद्रिय अधिक तल्लखपणे काम करतात. अनेक बाबतीत ते सामान्य व्यक्तींपेक्षा अधिक चांगले काम करतात. दिव्यांग व्यक्तींना समाजाकडून सहानुभूती नको, तर त्यांना सहकार्य आणि आशीर्वाद हवेत, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. राज्यपालांच्या हस्ते अंध व्यक्तींच्या अखिल भारतीय ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राजभवन येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले.

अंध व्यक्तींच्या ध्वज निधी संकलन मोहिमेचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ

Blind Peoples Flag Fundraising Campaign

संसदेने पारित केलेले दिव्यांग व्यक्तींचे विधेयक तयार करणाऱ्या संसदीय समितीचे आपण अध्यक्ष होतो. समितीच्या शिफारशीनुसार दिव्यांग व्यक्तींची व्याख्या व्यापक करण्यात आली असून नोकरीमध्ये देखील दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली असल्याचे राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.

दृष्टिबाधित व इतर दिव्यांग मिळून देशातील एक मोठा अल्पसंख्यांक समुदाय आहे. त्यांचे सामाजिक, आर्थिक व राजकारणातील समावेशन झाल्यास विकसित भारताचे लक्ष्य जलद गतीने गाठता येईल. कृत्रिम प्रज्ञा व मशीन लर्निंगमुळे शिक्षण व आरोग्य क्षेत्रात मोठे बदल होऊ घातले आहेत. युवा दिव्यांग व्यक्तींना ही कौशल्ये शिकवल्यास त्यांच्यासाठी नोकरीची अनेक दालने उघडतील असेही राज्यपालांनी सांगितले. नॅब संस्थेचे शासनाकडे प्रलंबित असलेले विविध विषय मार्गी लावण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही राज्यपालांनी यावेळी दिली.

संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी नॅबतर्फे नाशिक येथे मुलींसाठी चालविण्यात येणारी 'भावना चांडक महा नॅब स्कूल फॉर द ब्लाइंड' या शाळेतील सर्वच मुलींच्या शिक्षणासाठी शासनाकडून अनुदान मिळावे, अशी अपेक्षा राज्यपालांकडे व्यक्त केली. सध्या ८५ पैकी ४० मुलींच्या शिक्षणासाठी अनुदान मिळत आहे असे त्यांनी सांगितले. नाशिक येथे कर्णबधिर व अंध तसेच बहुविकलांग विद्यार्थ्यांसाठी असलेले 'बहुविकलांग केंद्र' (Multiple Handicapped Center) अनुदानित करावे, नॅब महाराष्ट्र ध्वज निधीसाठी सर्व शासकीय कार्यालयांनी योगदान द्यावे, यादृष्टीने सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक काढले जावे, आदी मागण्या त्यांनी केल्या.

सुरुवातीला नॅब महाराष्ट्राचे मानद सचिव गोपी मयूर यांनी प्रास्ताविक केले. तर खजिनदार विनोद जाजू यांनी राज्यपालांच्या कोटला ध्वजाची प्रतिकृती लावली. कार्यक्रमाला नॅब महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सूर्यभान साळुंके (सांगली), दिव्यांग उद्योजक भावेश भाटिया ( महाबळेश्वर), मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, मंगला कलंत्री, रघुवीर अधिकारी, रेणुका सोनावणे आदी उपस्थित होते.

Post a Comment (0)
Previous Post Next Post