राज्यातील लम्पी व्हायरस चा वाढता पर्दुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. राज्य शासनाने मंत्रालय मुंबई येथे 'लम्पी' (Lumpy Skin disease) साठी समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
राज्यात लम्पी या त्वचा रोगावर नियंत्रण आणण्यासाठी जनावरांचे लसीकरण करणे, संक्रमित जनावरांवर औषधोपचार करणे, पशुपालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे इत्यादी कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे.
राज्यातील शेतकरी पशुपालकांना लम्पी या रोगाविषयी संपर्क साधण्यासाठी मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली असून, ०२२-२२८४५१३२ या दूरध्वनी क्रमाकांवर पशुपालकांनी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांनी केले आहे.
ब्रेकिंग ! लम्पी आजाराने जनावरे दगावल्यास मिळणार 30 हजार
महाराष्ट्र राज्यात ४ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात प्रथमतः गोवंशीय पशुधनात (गाई मध्ये) विषाणूजन्य लम्पी हा चर्मरोग (Lumpy Skin disease) निदर्शनास आलेला आहे. आतापर्यंत सद्य:स्थितीत या रोगाचा प्रादुर्भाव राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये झपाट्याने पसरलेला आहे.
लम्पी या आजाराने जनावरे दगावल्यास राज्य शासनाकडून किती रक्कम मिळणार?
राज्यातील उद्भवलेला लम्पी रोगाचा प्रादुर्भाव व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी करावयाच्या आवश्यक त्या उपाययोजना याबाबत दि. १२ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या मंत्रीमंडळाने लम्पी या आजाराच्या (चर्मरोग) प्रादुर्भावामुळे ज्या शेतकरी / पशुपालकांच्या पशुधनाचा मृत्यू झालेला आहे, अशा शेतकरी / पशुपालकांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी धोरणामधील निकषाप्रमाणे १०० टक्के राज्य शासनाचे अर्थसहाय्य देण्याबाबत मंत्रिमंडळाने निर्देश दिलेले आहेत.
लम्पीने मृत पावलेल्या जनावरांच्या शेतकरी / पशुपालक यांच्या मृत पशुधनास खालील प्रमाणे अर्थसहाय्य मजूर करण्यात आले आहे.
- दुधाळ जनावरे गाय व म्हैस - (प्रति जनावर) रु. ३०,००० (३ मोठी दुधाळ जनावरे पर्यंत)
- ओढकाम करणारी जनावरे (बैल) -रु. २५००० (३ ओढकाम करणारी मोठी जनावरे
- पर्यंत)
- वासरे - रु.१६,००० (६ ओढकाम करणारी लहान जनावरे
- पर्यंत)
>> लम्पी व्हायरसने आजारी असलेल्या गायीचं दूध पिणं सुरक्षित आहे का, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
लम्पी या आजाराने जनावरे दगावल्यास राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी अर्ज कसा करावा?
शेतकरी / पशुपालक यांना अर्थसहाय्य अदा करण्याची कार्यपध्दती खालीलप्रमाणे
- ज्या शेतकरी / पशुपालक यांच्याकडील पशुधन लम्पी या चर्मरोगामुळे मृत्यूमुखी पडले आहे. अशा शेतकरी / पशुपालकांनी याबाबतची सूचना तात्काळ किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात / संबंधित पशुधन विकास अधिकारी / सहायक पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक तसेच ग्रामपंचायतीस द्यावयाची आहे.
- संबंधित शेतकरी / पशुपालक यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यावरील पशुधन विकास अधिकारी / सहायक पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक, ग्रामसेवक / तलाठी, पोलीस पाटील तसेच दोन स्थानिक नागरीक यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पशुधन मृत्यूमुखी पडल्याबाबतचा पंचनामा करून घ्यावयाचा आहे.
- सदर पंचनाम्यात पशुधनाचा मृत्यू लम्पी चर्मरोगामुळे झाला असल्याबाबतचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे.
- सदरचा पंचनामा संबंधित पशुधन विकास अधिकारी / सहायक पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक यांनी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय यांचेकडे किंवा तालुकास्तरावर ही संस्था नसल्यास लगतच्या तालुक्याच्या सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय यांचेकडे तात्काळ शक्यतो त्याच दिवशी सादर करावा.
लम्पी या आजाराने जनावरे दगावल्यास राज्य शासनाकडून आर्थिक मदत कधी मिळेल?
पंचनामा झाल्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी सदर अर्थसहाय्याची रक्कम संबंधित शेतकरी / पशुपालक यांच्या बँक खात्यात पंधरा दिवसांच्या आत थेट डीबीटीव्दारे जमा करावी. असे स्पष्ट निर्देश राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.
लम्पी या आजाराने जनावरे दगावल्यास राज्य शासनाकडून आर्थिक मदत शासन निर्णय
हे सुद्धा वाचा
>> लम्पी व्हायरसने आजारी असलेल्या गायीचं दूध पिणं सुरक्षित आहे का, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
>> लम्पी स्किन रोग काय आहे, माणसांना हा आजार होऊ शकतो?