{tocify} $title={Table of Contents}
बैल पोळा निबंध मराठी | Bail Pola Nibandh Marathi
बैल पोळा सणाचे महत्व
श्रावण महिना सुरू झाला की, अनेक सण सुरू होतात. त्यामध्ये नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी सोबतच 'बैलपोळा' श्रावणात पिठोरी अमावस्येला साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत साजरा केल्या जाणाऱ्या सणांमध्ये 'बैलपोळा' हा एक महत्त्वाचा सण आहे.
भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे 'बैलपोळा' या सणाला विशेष महत्त्व आहे. बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा 'बैलपोळा' हा एक मराठी सण आहे. हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो. या सणांमध्ये शेतकरी उत्साही असतात. शेतकऱ्यांना शेतामध्ये नांगरणीसाठी दिवसभर मदत करणाऱ्या बैलांचा हा हक्काचा दिवस असतो. त्यामुळे प्रत्येक शेतकरी आपला बैल उठुन दिसावा म्हणून बैलांची या दिवशी सजावट केली जाते.
बैल पोळा सजावट
'बैलपोळा' या सणाच्या दिवशी बैलांना सजवले जाते. या दिवशी शेतकरी आपल्या सर्व बैलांना नदीवर तसेच खदानी या ठिकाणी घेऊन बैलांची अंघोळ घालतात त्यांना चरायला घेऊन जातात. बैलपोळा जो मुहूर्त असेल त्या मुहूर्ताच्या अगोदर बैलांना छान पद्धतीने सजवले जाते.
बैलांच्या शिंगांना रंग, बेगड लावला जातो. नवा कासरा घुंगराच्या माळा, बैलांच्या गळ्यात घागरमाळा घालतात. कपाळावर गोंडा बांधला जातो. बैलांच्या पाठीवर तसेच पायांना वेगवेगळे रंग देऊन बैलांना सजवले जाते. त्याचबरोबर बैलांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली शाल/झालर/झूल देखील घालतात. यामुळे बैल रंगबेरंगी होऊन उठून दिसतात.
बैलपोळा मिरवणूक
'बैलपोळा' च्या मुहूर्तावर बैलांना गावामध्ये सर्व शेतकरी एकत्रित आणतात. तिथे त्यांना गावातील मंदिराचे दर्शन घेऊन गावातील वेशीत बैलांना उभे केले जाते. गावातील सर्व बैल सजावट एकत्रित पहावयास मिळते. गावातील सर्व बैलजोड्यांना सनया, ढोल, ताशे, वाजंत्री वाजवत एकत्र आणल्या जातात. या दिवशी गावांमध्ये उत्साहाचे वातावरण असते.
बैलांची पूजा
'बैलपोळा' फुटल्यानंतर शेतकरी , मुले बैलांना घेऊन आपल्या घरी घेऊन जातात. तिथे घरातील सुवासिनी बैलांना नाम ओढून, ओवाळून त्यांची पूजा करतात. त्यांना खायला गोड पुरण पोळीचा नैवेद्य देतात. या दिवशी बैलांची निगा राखणाऱ्या बैलकरनासुधा सुद्धा नवीन कपडे दिले जातात. या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात त्याला खांड शेकणे असेही म्हणतात. ज्यांच्या घरी बैल नाही असे, लोक मातीच्या 'बैलाची पूजा' करतात. त्यांना गोड पुरणपोळी चा नैवेद्य दाखवतात.
बैलपोळा पाडवा
बैल पोळ्याच्या दुसर्या दिवशी 'बैल पोळा पाडवा' साजरा केला जातो. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना घेऊन देवीच्या दर्शनाला जातात. तिथे बैलांना प्रदिक्षणा घालवण्यात येते. काही ठिकाणी छोटे-छोटे दुकाने लावली जातात. छोटी यात्रा या ठिकाणी भरवली जाते. घरातील सुवासिनी या दिवशी गोड-धोड करून देवीला नैवेद्य दाखवून 'बैल पोळा पाडवा' साजरा करतात.
अशाप्रकारे शेतकर्यांचा जिव्हाळ्याचा सण म्हणजे 'बैलपोळा' विशेषत: ग्रामीण भागामध्ये पारंपारिक पद्धतीने अतिशय उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो.
>> मराठी निबंध
>> सण/उत्सव